बक-या चारणारा मधुकर अधिकारी बनतो तेव्हा..

तोरंगण येथील मधुकर जाधव यांचे यश.

– श्री.मधुकर जाधव

     इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तोरंगण येथील मधुकर जाधव. आई-वडील मजदूर. रोजगार हमीच्या कामाला गेले तरच घरातील चूल पेटणार. छोटा मधुकर मात्र दिवसभर बक-या चारण्याचे काम करायचा. नित्यनेमाने दिवसभर बक-या चरायला घेऊन जाणे आणि सायंकाळी परत आणणे हाच दिनक्रम. अशा बिकट परीस्थितीतही शिक्षणासाठी अस्वस्थ झालेल्या मधुकरने गाव सोडून शहर गाठले. अपार जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर मधुकरने हे यश संपादन केले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील मधुकर जाधव या तरुणाची बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याचीच ही यशोगाथा. आपल्या दारिद्र्याला आपले नशीब समजून दिवस ढकलणारे अनेक जण असतात. परिस्थिती,नशीब यांना दोष देतात. परंतु काही जण याच बिकट परिस्थितीला संधी मानतात. नशिबाशी दोन हात करून समाजावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. आधार देणा-या हातांची साथ लाभली की त्यांच्या आयुष्याचे सोने होते. गावातील शासकीय आश्रमशाळेत मधुकर यांचे शिक्षण झाले. आपल्याला हवे ते साध्य करायचे असेल तर पुढील शिक्षणाला पर्याय नाही याची त्यांना जाणीव झाली. याच विचाराने त्यांनी गाव सोडून नातेवाईकांच्या मदतीने शहर गाठले. गंगापूररोड लगतच्या एका वस्तीगृहात राहून शिक्षण सुरु ठेवले. कला शाखेत प्रवेश घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. जनजाती कल्याण आश्रम,नाशिक या संस्थेतून त्यांना या स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळाली. त्यांनी एका खाजगी क्लासमध्ये शिक्षकाची अर्धवेळ नोकरी सुद्धा केली. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. शहर सोडून पुन्हा गावी यावे लागले.  गावात सायंकाळी मुलांसाठी मोफत शिकवणी घेतली. कोरोनाकाळ संपल्यानंतर पुन्हा वस्तीगृहात येऊन अभ्यास सुरु केला. त्यांच्या या अथक परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले. एम.पी.एस.सी या स्पर्धा परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. त्यांची बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

    जनजाती कल्याण आश्रमाचा ‘सेवाविभाग’ होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यास अत्यंत तत्पर आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. मधुकर जाधव यांना सुद्धा एम.पी.एस.सी तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तकांची मदत कल्याण आश्रमामार्फत केली होती. आज या तरुणास बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. -धनंजय जामदार (प्रांत सहकोषाध्यक्ष,जनजाती कल्याण आश्रम).

श्री.धनंजय जामदार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top